ठाणे : कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे स्थान प्राणीपालकांकडून देण्यात येते. परंतु अशा पाळीव प्राण्यांसाठी शहरात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे पाळीव प्राण्याचा काही कारणास्तव मृत्यु झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करणे प्राणीपालकांना शक्य होत नव्हते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने माजिवडा भागात पाळीव प्राण्यांची पहिली स्मशानभूमी उभारली असून तिचे लोकार्पण आज, शनिवारी होणार आहे. यामुळे पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करणे शक्य होणार असल्याने प्राणी पालकांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
ठाणे शहरात कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक घरांमध्ये या प्राण्यांचे स्थान घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे आहे. परंतु, आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाण्यात प्राण्यांची स्मशानभूमी नसल्याने अनेकांची अडचण होत होती. त्यामुळे पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी असावी अशी मागणी प्राणीपालकांकडून व्यक्त होत होती. याचदरम्यान, मुक्या प्राण्यांसाठी एक स्वातंत्र स्मशानभूमी असावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आणि तशी सुचना त्यांनी ठाणे महापालिकेला केली होती. यानंतर ठाण्यातील कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे पाळीव आणि लहान प्राण्यांसाठी स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते. महाराष्ट्रातील सर्वात पहिली गॅसदाहिनी असणारी अद्ययावत स्मशानभूमी माजीवाडा येथे उभारण्यात आली आहे. याच स्मशानभूमीमध्ये पाळीव प्राण्यांना विधीवत पद्धतीने निरोप देण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी देखील उभारण्यात आली आहे.

