पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरी-चिंचवड शहरात उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून, अनेक मंडळांनी यंदा चित्रपटसृष्टीतील कलाकार, लोकप्रिय अभिनेते, अभिनेत्री, नामांकित खेळाडू तसेच सोशल मीडिया सेलिब्रिटींना आमंत्रित करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष नियोजन केले आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान स्टेजवर अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्य, सार्वजनिक शिस्त भंग करणारे कार्यक्रम किंवा गर्दीला चिथावणी देणारे प्रकार आढळल्यास संबंधित आयोजक मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. उत्सवाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे अश्लील सादरीकरण किंवा समाजात चुकीचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमांना पोलिसांकडून अजिबात सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आयोजकांनी कार्यक्रमांचे नियोजन करताना सुरक्षेचे नियम, वाहतूक व्यवस्था, आपत्कालीन सुविधा आणि गर्दी नियंत्रण याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही उत्सवाचा आनंद घेताना कायद्याचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद बाब तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची समन्वय बैठक घेऊन शांतता, शिस्त आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, डीजे, ध्वनिक्षेपक आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भातील न्यायालयीन तसेच शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश मंडळांना देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या सूचनांचे पालन करून शांततेत, शिस्तबद्ध आणि संयमाने विसर्जन पार पाडणाऱ्या गणेश मंडळांचा ‘श्री मोरया गणपती पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यामागचा उद्देश नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देणे आणि इतर मंडळांसमोर आदर्श निर्माण करणे हा असल्याचे पोलिसांनी सांगितले. यंदाही उत्सवाच्या काळात शहरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत देखरेख ठेवली जाणार आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव हे सामाजिक ऐक्य, परंपरा आणि संस्कृती जपणारे उत्सव असून ते शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कायद्याचे पालन करत साजरे करण्यासाठी आयोजक, नागरिक आणि पोलिसांनी परस्पर सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.
