मुंबई प्रतिनिधी : अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट संघाने एक मोठा इतिहास रचला आहे. मुंबईने तब्बल 27 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ईराणी कप जिंकला आहे. सर्फराज खान आणि तनुष कोटीयन ही जोडी मुंबईच्या विजयाची शिल्पकार ठरली. मुंबईकडून या स्पर्धेत पहिल्यांदाच द्विशतक करणारा सर्फराज खान हा ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराचा मानकरी ठरला. तर मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटीयन याने शतकी केल्याने मुंबईचा विजय सुखकर झाला.
मुंबई क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला तो पहिल्या डावात दुहेरी शतक करणारा सर्फराज खान. मुंबईने पहिल्या डावात 537 धावा केल्या होत्या. यात सर्फराज खानचा वाटा होतात तब्बल नाबाद 222 धावांचा. सर्फराजने 286 चेंडूंचा सामना करत तब्बल 25 चौकार आणि चार षटकारांची बरसात केली. सर्फराजला अजिंक्य राहणे, तनुष कोटियन आणि श्रेयस अय्यरची दमदार साथ लाभली. कर्णधार अजिंक रहाणेने 97 धावे केल्या तर तनुष 64 आणि अय्यरने 57 धावा केल्या.
पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा आणि यश दयालला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील रेस्ट ऑफ इंडिया संघाचा पहिला डाव 416 धावांवर आटोपला. या संघाकडून अभिमन्यू इश्वरनने 191 धावांची झुंजार खेळी केली, तर ध्रुव जुरेलने 93 धावा करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना संघाला आघाडी मिळवून देण्यात अपयश आले.
दुसऱ्या डावात मुंबईने 8 बाद 329 धावा केल्या. यात तनुश कोटियनने नाबाद 114 धावा केल्या. तर पृ्थ्वी शॉने 76 धावा केल्या. यानंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन केलं आणि यासह सामना बरोबरीत सुटला. इराणी कप स्पर्धेत सामना बरोबरीत सुटल्यास पहिल्या डावातील आघाडी असलेल्या संघाला विजयी घोषित केलं जातं. या नियमानुसार मुंबईने पहिल्या डावात 121 धावांची आघाडी मिळवल्याने मुंबई संघाला विजयी घोषित करण्यात आले. मुंबई संघाने आतापर्यंत सर्वाधिक 15 वेळा इराणी कपवर आपलं नाव कोरलं आहे. तर रेस्ट ऑफ इंडियाने सर्वाधिक 30 वेळा जेतेपद पटकावलं आहे.
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान. रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.