पुणे : सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांना लुबाडण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरत आहेत. या गुन्हेगारांचा बंदोबस्त करणे तपास यंत्रणांनाही शक्य होत नसल्याने चित्र आहे. त्यामुळे आता कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून कंपन्या ग्राहकांच्या संरक्षणाची पावले उचलू लागल्या आहेत.
पुणे स्थित क्विक हील टेक्नॉलॉजीज आणि दूरसंचार क्षेत्रातील एअरटेल या दोन कंपन्यांनी सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ग्राहकांच्या संरक्षण करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला आहे. क्विक हीलने ‘अँटीफ्रॉड.एआय’ सोल्यूशनची घोषणा गुरुवारी केली. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी म्हणाले की, या सोल्यूशनचा वापर संगणक, लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये करता येणार आहे. यामुळे नागरिकांचे ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण होणार आहे. यात बँक सेवा फसवणूक इशारा, फसव्या लिंक आणि संकेतस्थळापासून संरक्षण, डार्क वेबवर तुमची माहिती असल्यास दक्षतेचा इशारा, सुरक्षित ऑनलाइन व्यवहार आदी गोष्टी ग्राहकाला मिळतील. क्विक हील टोटलच्या २५ व्या आवृत्तीत या सोल्यूशनचा समावेश असणार आहे.
अनेक वेळा मोबाईलवर स्पॅम संदेश आणि अथवा कॉल येतात. या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी एअरटेलने कृत्रिम प्रज्ञा आधारित स्पॅम शोध प्रणाली सुरू केली आहे. याबाबत भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र व गोवा) जॉर्ज मथेन म्हणाले की, प्रत्येक आर्थिक फसवणुकीचा प्रकार हा स्पॅमने सुरू होतो. अनेक जणांना आपल्या मोबाईलवर आलेला कॉल हा स्पॅम असल्याचे माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याचा धोका अधिक असतो. एअरटेलने कृत्रिम प्रज्ञा आधारित प्रणाली सुरू केली असून, त्याद्वारे ग्राहकांना तातडीने संदेश अथवा कॉल स्पॅम असल्याचा इशारा मिळेल. त्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही.