मुंबई : लोकल ११० ते १३० किमी ताशी वेगाने धावत्या ठेवण्यासाठी आणि रूळ ओलांडणीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावर ४०४ किमीचे सुरक्षा कुंपण बसवण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. मुंबई रेल्वेवर सर्वाधिक अपघात मृत्यू आणि जखमी रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे होत आहेत. तसेच अपघातांमुळे रेल्वे वेळापत्रकावरही परिणाम होतो. रेल्वे रुळांवर वन्यप्राणी आल्यास रेल्वे अपघात होऊन हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याचा धोका असतो. यामुळे रुळांलगत सुरक्षा कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर विभागांत एकूण १,२८२ किमी लांबीचे सुरक्षा कुंपण उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी ४०४ किमीचे कुंपण मुंबई विभागातील मुंबई उपनगरी रेल्वे रुळांच्या लगत उभारण्यात येणार आहेत. रुळांलगत ८ फूट उंच भिंत तर काही ठिकाणी लोखंडी जाळे अशा संमिश्र स्वरूपात सुरक्षा कुंपण उभारण्यात येणार आहे. यासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिल २०२५पर्यंत सुरक्षा कुंपण उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मुंबई रेल्वेवरील झोपडपट्टी असलेल्या भागांतून रेल्वे रुळांवर कचरा टाकण्यात येतो. कचरा कुजून रेल्वे रुळांला हानी पोहोचते. रुळांलगत राहणाऱ्या नागरिकांना अनेकदा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही रुळांवर कचरा येण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कुंपण उभारण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग असा होणार सुरक्षित
– ४०४ किमी अंतरापर्यंत सुरक्षा कुंपण
– काही ठिकाणी रुळांलगत ८ फूट उंच भिंत
– काही ठिकाणी लोखंडी जाळे
अपेक्षित खर्च – २०० कोटी रुपये
काम पूर्ण करण्याचे लक्ष्य- एप्रिल २०२५पर्यंत