पुणे : राज्य शासनाच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे आणि सोलापूर येथे धडक कारवाई करत विना लेबल तूप आणि भेसळीच्या संशयित नमकीनचा एकूण १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान पुण्यातील एका आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवानाही तात्काळ निलंबित करण्यात आला. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत पिंपळे गुरव येथील मे. देवांश मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २३० किलो वजनाचा आणि सुमारे ९० हजार ५०० रुपये किमतीचा तुपाचा साठा कोणतेही आवश्यक लेबल नसलेल्या अवस्थेत आढळून आला. या तुपामध्ये भेसळीचा संशयही व्यक्त करण्यात आल्याने संबंधित साठा तात्काळ जप्त करण्यात आला. तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) विश्वजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शि. ग. घाटोळ यांनी सा. सु. पटवर्धन आणि अक्षय शेळके यांच्या पथकासह केली. अन्नपदार्थांची गुणवत्ता, लेबलिंग आणि नियमांचे पालन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मे. संगीता फूड प्रॉडक्ट्स या आस्थापनेची तपासणी केली. तपासणीदरम्यान उत्पादनावरील लेबलमध्ये त्रुटी आढळून आल्या तसेच नमकीनमध्ये भेसळीचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे १६० किलो वजनाचा आणि सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा नमकीनचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कि. घ. देशमुख यांनी केली. अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विनापरवाना किंवा नियमबाह्य पद्धतीने अन्न व्यवसाय करणाऱ्या, निकृष्ट दर्जाचे अथवा भेसळयुक्त अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया किंवा विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशारा सहआयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्न व्यवसायांवर सातत्याने देखरेख ठेवून अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
