बोईसर : पश्चिम रेल्वेवरील दोन तासांच्या मेगा ब्लॉकमुळे पालघर ते डहाणू दरम्यान उपनगरीय लोकल सेवेवर परीणाम होऊन काही गाड्यांच्या पालघर ते डहाणू दरम्यानच्या सेवा रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल झाले. प्रवाशांच्या सेवेसाठी बोईसर व पालघर एसटी आगारामार्फत जादा फेर्या सोडण्यात आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तरी देखील वयोवृद्ध व लहान मुलांना एसटी बसमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे शिरणे त्रासदाय झाल्याचे दिसून आले.
पश्चिम उपनगरी रेल्वे मार्गावरील पालघर स्थानकाजवळील कामासाठी शनिवारी व रविवारी दुपारी १० ते १२ वाजेदरम्यान दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विरारवरून डहाणूकडे जाणार्या व डहाणूवरून विरारकडे जाणार्या उपनगरीय लोकल सेवेवर या मेगा ब्लॉकचा परीणाम झाला. विरारवरून डहाणूकडे जाणार्या चार लोकल पालघर ते डहाणू स्थानकादरम्यान रद्द करण्यात आल्याने पालघर पर्यंत सोडण्यात आल्या. तर डहाणूवरून विरारकडे जाणार्या तीन लोकल व वापी विरार शटल रद्द करण्यात येऊन पालघर स्थानकातून सोडण्यात आल्या. यामुळे डहाणू, वाणगाव, बोईसर व उमरोळी परीसरातील चाकरमानी, प्रवासी, लग्नसराईसाठी बाहेर पडलेले नागरीक यांचे मोठे हाल झाले. दोन तास लोकल सेवा बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांनी सार्वजनिक व खाजगी वाहतूक सेवेचा आधार घेतला. पालघर आगाराकडून बोईसर पर्यंत चार तर बोईसर आगाराकडून पालघरपर्यंत १२ ज्यादा एसटी फेर्या प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात आल्या. अशाच प्रकारचा मेगा ब्लॉक उद्या रविवारी घेण्यात येणार असल्याने लग्नसराईचा मोठा मुहूर्त असल्याने नागरिकांनी या संदर्भात दखल घेऊन पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.