पुणे : राज्यभरातील विविध जिल्ह्यांत दरोडा तसेच घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या यूनिट सहाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून सहा लाखांचा ऐवज देखील जप्त केला आहे. हंजराज उर्फ हंसु रणजितसिंग टाक (वय १८, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर असलेल्या ९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील ७, अहमदनगर येथील १ व सोलापूरमधील ५ असे गन्हे उघड झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निट सहाचे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल व त्यांचे पथक घरफोड्या गुन्ह्याचा तपास करत असताना माहिती मिळाली की, हंसराज टाक याने घरफोडी केली असून, तो हडपसरमधील कॅनोर रोड येथे आहे. त्यानूसार, पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याला अटककरून सखोल तपास केला असता त्याने पुण्यासह सोलापूर व अहमदनगर येथेही गुन्हे केल्याचे सांगितले. माहितीत त्याने ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यातील ६ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तर, अघून-मधून दरोड्याचे देखील प्रकार घडत आहेत. मात्र, अनेकवेळा पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीत असतानाच चोरट्यांना पकडले जात आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पथकांना हद्दीत गस्त घालण्याबाबत सूनचा देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाश शेळके, कानिफनाथ कारखेले व त्यांच्या पथकाने केली आहे.