कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांच्या वाढत्या मागणीवरून उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि कल्याण रिक्षा चालक टॅक्सी महासंघाने मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक गेल्या आठवड्यात सुरू केली होती. उद्घाटन प्रक्रियेसाठी मीटरप्रमाणे रिक्षा चालकांची एक रांग निर्माण करण्यात आली होती. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन रांगा वाढविण्याचा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा विचार होता. परंतु, मीटर असलेल्या एका रांगेतील रिक्षांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित रिक्षा चालकांनी नेहमीप्रमाणे शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर शहराच्या विविध भागात जाण्यासाठी अनेक वेळा रिक्षा मिळणे अवघड होते. शेअर पध्दतीने रिक्षेने प्रवासी वाहतूक केली तर त्यासाठी रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहनतळावर ताटकळत राहावे लागते. अनेक प्रवासी मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करावी म्हणून रिक्षा चालकांना सांगतात. पण, कल्याणमध्ये ही पध्दत नाही. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होतो. अनेक जाणकार प्रवाशांनी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातून शहराच्या विविध भागात जाण्यासाठी मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरू करावी म्हणून परिवहन विभागाकडे मागणी केली होती. ही मागणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी तात्काळ मान्य केली होती. त्याप्रमाणे रिक्षा संघटनेच्या सुचनेप्रमाणे पहिल्या टप्प्यात एका स्वतंत्र रांगेतून पन्नास रिक्षा मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सुरूवातीचे दोन दिवस मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. मीटरप्रमाणे प्रवासी भाडे शहराच्या विविध भागात जाण्यासाठी ३० ते ५० रूपये होते. याच मार्गावरील शेअर पध्दतीचे भाडे मात्र १५ ते २५ रूपये असते. त्यामुळे मीटरप्रमाणे दररोज प्रवासी वाहतूक केली तर आपणास मोठा भुर्दंड बसेल असा विचार करून मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांनी हळुहळू मीटरप्रमाणे रिक्षा प्रवासी वाहतुकीकडे पाठ फिरवली. दिवसभरात १० ते १५ प्रवासीपण मीटरप्रमाणे वाहतुकीसाठी तयार होत नसल्याने रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे रिक्षा चालकांनी पुन्हा नेहमीच्या रांगेतून शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी प्रवाशांची मानसिकता ही शेअर पध्दतीने प्रवासी वाहतुकीला आहे, असे जाणत्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

