सांगली : केंद्रातील एनडीए सरकारने मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी अभिजात दर्जा देण्याची मागणी होत होती. केंद्र सरकारने गुरुवारी (३ ऑक्टोबर) या निर्णयाची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचं अभिनंदन करत शरद पवारांनी आनंद व्यक्त केला.
शरद पवार सांगली दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “प्रत्येक मराठी माणसांचं मनापासून समाधान व्हावं, असंच ते कालचं वृत्त होतं. गेली अनेक वर्षे केंद्र सरकारकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा म्हणून मागणी होती. ती मागणी महाराष्ट्र सरकारने केली. ती मागणी साहित्यीक संस्थांनी केली. ती मागणी साहित्य परिषदेमध्ये, अधिवेशनात ठराव करून केली. माझ्यासारख्या अनेक सहकारी, ज्यांना या प्रश्नामध्ये आस्था आहे. आम्ही लोकांनी सुद्धा व्यक्तिगत पातळीवर केंद्र सरकारला या सबंधीचा आग्रह केला.”
“आज वृत्त वाचायला मिळाले. केंद्र सरकारने पाच भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला. आसामी, पाली, मराठी आणि दोन भाषा. या निर्णयाचा उपयोग भाषांचे महत्त्व वाढण्यासाठी अतिशय होणार आहे”, असे भाष्य शरद पवार यांनी केले.
“यापूर्वी मराठी भाषेत जे लिखाण झालं आणि फारसं लोकांच्या नजरेसमोर नाही. ते लोकांच्या नजरेसमोर आणण्याचा एक मार्ग खुला झाला. याशिवाय नवी पिढी यासंदर्भात काही लिहू पाहत असेल, तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. प्रतिवर्षी सरकारकडून सुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची तरतूद त्यामध्ये आहे. त्याचाही त्यामध्ये लाभ होईल. हा जो निर्णय झाला, त्याला उशीर झाला; जरी उशीर झाला पण निर्णय झाला. याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो”, असे शरद पवार म्हणाले.