पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी (१ऑगस्ट) रोजी पुण्यात टिळक स्मारक समितीच्या वतीने दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. १९८३ सालापासून आतापर्यंत अनेक दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या दिग्गजांच्या यादीत इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह, प्रणव मुखर्जी, श्रीपाद अमृत डांगे यांच्यापासून ते राहुल बजाज, बाबा कल्याणी यांच्यापर्यंत अनेक मान्यवरांचा समावेश आहे. आता या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला आहे.
नरेंद्र मोदी यांना आज ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जे उपरणं वापरायचं अगदी तशाच पद्धतीचं खास उपरणं भेट म्हणून देण्यात आलं. यासह लोकमान्य टिळकांची ओळख असलेली खास पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि विशिष्ट अशी ट्रॉफी देण्यात आली. ज्यामध्ये श्रीमद्भगवद्गीता, लोकमान्यांची पगडी, केसरीचा पहिला अंक आणि लोकमान्य टिळकांच्या मूर्तीचा समावेश आहे. तसेच या पुरस्कारासह नरेंद्र मोदींना १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही रक्कम नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ‘नमामी गंगे’ या प्रकल्पासाठी देण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात कुठल्याही कार्यक्रमात किंवा निवडणूक प्रचारात एखादं भाषण करतात, तेव्हा त्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतात. आजही त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आज लोकशाहीर आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने त्यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं.
कधीपासून दिला जातो हा पुरस्कार?
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची सुरुवात 1983 रोजी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने केली. हा पुरस्कार दरवर्षी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रदान केला जातो. लोकमान्य टिळक हे 20 व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य संग्रामामधील प्रमुख नेत्यांपैकी एक होते.
कोणाकोणाला देण्यात आला आहे हा पुरस्कार?
पंतप्रधान मोदींच्या आधी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा आणि प्रणब मुखर्जींना प्रदान करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच एस. एम जोशी, शरद पवार त्याशिवाय प्रसिद्ध उद्योजक आर. नारायणमूर्ती, मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ई. श्रीधरन यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एकूण 40 जणांना आतापर्यंत हा पुरस्कार देण्यात आला आहे.