रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असून हे काम करत असताना येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.
मुंबई – गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. परंतु बोगद्यातून वाहतूक सुरू केल्यानंतर अनेक वेळा काही कारणास्तव हा बोगदा नेहमीच बंद करण्यात येतो. त्यामुळे वाहन चालकांना कशेडी घाटाचा पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो.
सद्यस्थितीत घाट रस्त्याची गेले अनेक वर्षे डागडुजी न केल्याने घाट रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे. अनेक ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी रस्त्यालगत असलेली गटारे देखील नादुरुस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या घाट रस्त्याने रात्रीचे वाहतूक करणे हे धोकादायक बनले आहे. त्यामुळे कशेडीतील या बोगद्याचे काम लवकरच पुर्ण होण्याची अपेक्षा वाहन चालकांमधून करण्यात येत आहे.