ठाणे : कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील कासा रिओ भागात जय मल्हार चायनिज ढाबा येथे विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या ढाबा चालका विरुध्द मानपाडा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. कल्याण परिमंडळातील पोलिसांनी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून परिमंडळातील बेकायदा धंद्यांविरुध्द जोरदार मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, हवालदार विजय आव्हाड आणि गस्ती पथक रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान पलावा कासा रिओ भागात गस्त घालत होते. त्यांना जय मल्हार चायनिज ढाबा येथे ग्राहकांना मद्य पिण्यासाठी दिले जात असल्याचे दिसले. नऊ ग्राहक खुर्ची, मंचकावर मद्याचे पेले मद्य पित बसले होते.
मानपाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने जय मल्हार चायनिज ढाब्यामध्ये रविवारी रात्री प्रवेश केला. तेथील ग्राहक सेवा देणारे चायनिज ढाब्याचे प्रमुख शशिकांत कुंभार यांच्याकडे चायनिज ढाब्यात मद्य विक्री करण्यासाठी लागणारा परवाना आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी असा परवाना नसल्याची माहिती कुंभार यांनी पोलिसांना दिली.
मद्य विक्री करण्याचा परवाना नसताना लोकांना बेकायदेशीरपणे मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करून, तसेच विनापरवाना खाद्य पदार्थाची विक्री करताना आढळून आल्याने पोलिसांनी चायनिज ढाबा चालक शशिकांत कुंभार यांच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधित कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अधिकच्या चौकशीसाठी कुंभार यांना पोलीस ठाण्यात आणले. कुंभार हे पडले गाव जवळील नौपाडा गावचे रहिवासी आहेत.