मुंबई : महिला पोलिसाच्या विनयभंगप्रकरणी चार आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. हरिश मांडवीकर, दीपक पांडे, सुभाष चौधरी आणि राजहंस कोकीसरेकर अशी या चौघांची नावे आहेत. कांदिवलीतील गणपती बंदोबस्तादरम्यान घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या चौघांनाही बुधवारी न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगळवारी अनंत चतुर्दशीला हरिश मांडवीकर हा कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात प्रतिबंधित परिसरातून विसर्जनस्थळी जात असताना त्याला महिला शिपायाने थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्याशी हुज्जत घालून तिला धक्काबुक्की केली. हरिशचे इतर तीन सहकारी तिथे आले व या चौघांनी पुन्हा पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी हरिशसह त्याच्या इतर तिन्ही सहकाऱ्याना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हरिश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह खंडणीसाठी धमकी देणे, हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे असे दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने मटका किंग सुरेश भगत याची हत्या केली होती. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती.