रायगड प्रतिनिधी : रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस आणि शेवंड हे सर्वाधिक मागणी असणारे मासे समुद्रातून गायब झाल्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत. मत्स्य उत्पादन घटल्याने मच्छीमारांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील प्रत्येक गावा गावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चालतो. गावातील अनेक कुटुंबे मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहेत. रायगड जिल्ह्यात पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येत होती. मात्र मागील काही वर्षांत जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटत चालले आहे. त्यातच प्रमुख माशांच्या प्रजातींचेही उत्पादन घटल्याने मासेमारीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. बाजारात जास्त दर असलेल्या जिताडा, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड या जातीच्या मासळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. जिल्ह्यात सध्या पापलेट, सुरमई, रावस, भाकस, कोलंबी, माकुल, मांदेली, बांगडा, बोंबिल या जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने मासेमारांना थोडा दिलासा आहे.
मत्स्य उत्पादनवाढीसाठी कोकणात दर्जेदार बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणारा एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही. शीतगृह, मत्स्य प्रक्रिया केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. कोकणातल्या इतर दोन जिल्ह्यांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मत्स्य व्यवसायात सुधारणा झाल्यास मासेमारांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मत अनेक मच्छीमारांनी व्यक्त केले आहे.