ठाणे : ठाणे शहरातील नैसर्गिक प्रवाहांच्या नाल्यांवर काॅंक्रीटचे आवरण टाकून त्यावर रस्ते, वाहनतळ, वाणिज्य गाळ्यांची उभारणी करण्याचे ‘उद्योग’ करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने एका प्रकरणात नोंदवलेल्या निरिक्षणांमुळे चिंतेची बाब सामोर आली आहे, नवी मुंबईतील ऐरोली उपनगरामधील अशाच एका खुल्या नाल्यावर स्लॅब टाकून बेकायदा बांधकाम केले जात असल्याची तक्रार एका याचिका कर्त्याने केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हरित न्यायाधिकरणाने अशाच पद्धतीच्या अनधिकृत आणि बेकायदा प्रकरणांबाबत विविध निरिक्षणे नोंदवताना हे नाले खुलेच असायला हवेत अस मत प्रदर्शन केल्याने यासंबंधीची सर्वच कामे यापुढे महापालिकांना आवरती घ्यावी लागणार आहेत.