मुंबई : गेली १८ वर्षे प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचे कारण ठरले ते मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या गोकुळधाम सोसायटीच्या सेटचे. सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये गोकुळधाम सोसायटीच्या सेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू असल्याचे दिसत आहे. सेटवर बांधकाम साहित्य, लाकडी फळ्या आणि कामगार दिसत असल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अनेकांनी मालिका बंद होत असल्याची किंवा गोकुळधाम सोसायटी कायमची हटवली जात असल्याची चर्चा सुरू केली. गेली अनेक वर्षे जेठालाल, भिडे, पोपटलाल, अय्यर, डॉ. हत्ती आणि इतर पात्रांच्या गमतीजमतींचे केंद्र असलेली ही सोसायटी मालिकेची ओळख बनली आहे. त्यामुळे सेटवरील कामाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.
चाहत्यांच्या चर्चेनंतर मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देत सर्व अफवांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट केले की, गोकुळधाम सोसायटीचा सेट पाडला जात नसून त्याचे नूतनीकरण सुरू आहे. त्यांनी सांगितले की, हे काम मालिकेला अधिक आकर्षक स्वरूप देण्यासाठी करण्यात येत असून काही दिवसांत गोकुळधाम सोसायटी नव्या रंगरूपात आणि आधुनिक अवतारात प्रेक्षकांसमोर येईल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असित कुमार मोदी स्वतः कामाची पाहणी करताना तसेच अभियंते, पर्यवेक्षक आणि कामगारांशी चर्चा करतानाही दिसत आहेत. मात्र, मालिकेची ओळख असलेल्या गोकुळधाम सोसायटीचा मूळ चेहरा किंवा तिची वैशिष्ट्ये बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही मालिकेच्या कथानकाचा भाग म्हणून गोकुळधाम सोसायटीच्या नूतनीकरणाचे दृश्य दाखवण्यात आले होते. यावेळी मात्र प्रत्यक्ष सेटच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू असून, प्रेक्षकांना लवकरच नव्या स्वरूपातील गोकुळधाम सोसायटी पाहायला मिळणार आहे.
