वसई : वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये अजूनही पाणी साचले असून शहरातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. प्रमुख रस्ते आणि सखल भाग अद्याप जलमय असल्याने शहरांतर्गत प्रवासासाठी नागरिकांना सलग सातव्या दिवशी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, ६ जुलै रोजी तब्बल ३२५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने गेल्या २४ तासांत शहरात सरासरी १८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणारा पाऊस, पाण्याचा नैसर्गिक निचरा होणाऱ्या मार्गांवरील अतिक्रमणे, पाणथळ जागांवर वाढलेले बांधकाम आणि नालेसफाईतील त्रुटी यामुळे शहरातील अनेक सखल भागांसह प्रमुख रस्ते चार ते पाच दिवसांपासून पाण्याखाली आहेत. परिणामी खासगी वाहने, रिक्षा, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा प्रभावित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतीकामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच नागरिकांसाठी पर्यायी वाहतुकीचे महत्त्वाचे साधन ठरले आहेत.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी रेल्वे स्थानके, बस आगार, महामार्ग आणि विविध जोडरस्त्यांवर ट्रॅक्टरची रांग लागलेली दिसत असून, चाकरमान्यांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी ट्रॅक्टरचालकांकडून सेवा पुरविली जात आहे. या ट्रॅक्टरमधून प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून ४० ते ५० रुपये भाडे आकारले जात आहे. मात्र, पाण्याखालून वाहतूक करताना ट्रॅक्टर चालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खोल पाण्यातून जाताना टायर पंक्चर होणे, तांत्रिक बिघाड होणे किंवा ट्रॅक्टर बंद पडणे अशा समस्या वारंवार उद्भवत असल्याचे चालकांनी सांगितले. तरीही नागरिकांच्या गरजेपोटी ते सेवा सुरू ठेवत आहेत. दरम्यान, शहरातील साचलेले पाणी लवकरात लवकर कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
