मुंबई : राज्यातील ग्रामीण, डोंगरी आणि आदिवासी भागातील प्रवाशांना अधिक सक्षम वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात विशेष २०० मिनी बस दाखल करण्यात येणार असून, येत्या दोन महिन्यांत या बस दुर्गम भागात सेवेत दाखल होतील, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत केली. आमदार बच्चू कडू, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी एसटीच्या सुरक्षितता, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक वाहतूक, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि आर्थिक सुधारणांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या. मेळघाट, विदर्भ आणि कोकणातील डोंगराळ भागात मोठ्या बस चालविण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन २८ प्रवासी क्षमतेच्या मिनी बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बसमुळे आर्थिक तोटा होण्याची शक्यता असली तरी जनहिताला प्राधान्य देत त्या दुर्गम भागात चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील तीन वर्षांत राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यात सुमारे ७ हजार एसटी अपघात झाले असून, त्यामध्ये ८१५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. यापैकी ४,२८१ अपघातांसाठी चालक जबाबदार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांवर विभागीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. चालकांना नियमित प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, ‘सफर सुरक्षा’ उपक्रम तसेच अपघातमुक्त सेवेसाठी प्रोत्साहनपर योजना राबविल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी सन २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण बस ताफा इलेक्ट्रिक करण्याचा धोरणात्मक निर्णय मे २०२६ मध्ये घेण्यात आल्याची माहितीही परिवहन मंत्र्यांनी दिली. ई-वाहन धोरण २०२१ अंतर्गत ६४८ इलेक्ट्रिक बससाठी सुमारे ९८.१८ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, सध्या फेम-२ आणि इतर योजनांतर्गत ९०७ हून अधिक ई-बस राज्यात धावत आहेत. तसेच ३९ ठिकाणी चार्जिंग स्टेशन कार्यरत आहेत. चालक-वाहकांच्या विश्रामगृहांच्या उभारणीसाठी २०० कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली. आमदार बच्चू कडू यांच्या मागणीनुसार राज्यातील नूतनीकरण होत असलेल्या सर्व एसटी डेपोमध्ये दिव्यांगांसाठी एक ते दोन गाळे आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना बंदी असून, आरटीओ आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त कारवाईत २०० हून अधिक खासगी बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गांचे सुसूत्रीकरण, मोबाईल अॅप आणि यूपीआयद्वारे डिजिटल तिकीट प्रणाली प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
