कल्याण: अल्पवयीन मुलांनी वाहने चालविणे धोकादायक असून, तो गंभीर गुन्हा आहे. मात्र, गरजेसाठी विद्यार्थांना वाहने चालवायचीच असतील, तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकी हा पर्याय आहे. शून्य अपघात आणि त्यापलीकडे जाऊन अपघात पूर्ण रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पार्किंगच्या जागेवरच पार्क करावीत यांसारख्या सूचना प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने डोंबिवलीतील तोंडवळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत ‘आरटीओ’कडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लूरकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हेमंत जयकर, रोहित पवार, रिक्षा युनियनचे नेते अंकुश म्हात्रे, भिकाजी झाडे, शेखर जोशी आणि तोंडवळकर विद्यालयचे शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी दपतरे देण्यात आली.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती करत अपघात कमी करण्याबरोबरच वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमाचे पालन केले जावे, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहन चालकांनीही पुढे यावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यासाठी प्राप्त झालेल्या निधीतून रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर यांसारख्या उपक्रमाबरोबरच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील अनुदानित शाळेच्या विद्यार्थ्यंना वाहतुकीचे धडे देण्यात आले. आठवी आणि नववीच्या वर्गात शिकणारे अनेक विद्यार्थी परवाना नसतानाही हौस म्हणून दुचाकी चालवत असल्याचे या चर्चा सत्रात विद्यार्थ्यांनी मान्य केल्यानंतर रोहित पवार यांनी, या विद्यार्थ्यांना त्यातील धोके समजावून देत यामुळे होणाऱ्या शिक्षेबाबत माहिती दिली. तर वरिष्ठ अधिकारी कल्लूरकर यांनी, ‘तुम्ही नियमांचे पालन करा आणि कुटुंबीयांना तसेच मित्र-मैत्रिणींनाही याबाबतची माहिती द्या,’ असे आवाहन केले. यावेळी रिक्षा युनियनचे नेते अंकुश म्हात्रे यांनी पार्किंगच्या जागांवर फेरिवाल्यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करत वाहनांचे पार्किंग करायचे कोठे, असा प्रश्न उपस्थित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर जोशी यांनी केले.