मुंबई : मुंबईत मालाड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात बेकायदेशीर क्लिनिक चालवणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखे कक्ष १२ ने कारवाई केली आहे. परवेज अब्दुल अजित शेख, शहाजी या सहाब अली अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी परवेज अब्दुल अजित शेख हा एका हत्येच्या प्रकरणात २००३ पासून फरार होता. त्याच्या मुंलुंड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद आहे. या परवेज शेखचा शोध घेत असताना मुंबई पोलिसांच्या पथकाने मालवणीमधील क्लिनिकचा भंडाफोड केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परवेज शेखच्या विरोधात २०२३ मध्ये हत्येचा गुन्हा नोंद होता. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार होता. मुंबई पोलिसाचं पथक त्याच्या मागावर होते. यावेळी आरोपी हा मालवणी परिसरात अवैध क्लिनिक चालवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन क्लिनिकवर छापा टाकला. या क्लिनिकमधील बोगस डॉक्टर परवाना नसताना इंजेक्शन आणि सलाईन देऊन फसवणूक करत असल्याचं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी या बोगस डॉक्टरला अटक केली. या कामात त्याची पत्नीही साथ देत असल्याचे आढळले. आरोपीच्या पत्नीकडे बीयूएमएस ही पदवी आहे. या क्लिनिकमध्ये परवाना नसलेली औषधे ठेवली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी परवेज शेख आणि त्याची पत्नी यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४१९, ४२०, ३४ या कलमासह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट कलम ३३ अ, ३३ ब, ३५ (२), ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने या आरोपींना मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या आरोपी विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात २०२१ तर मालवणी पोलीस ठाण्यात २०१९ आणि २०२० मध्ये फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणात आरोपी परवेजसह त्याची ३२ वर्षीय पत्नी यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.