मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने तब्बल २५२ कोटी २८ लाखांचे ड्रग्ज् हस्तगत केले आहे. पोलिसांनी ड्रग्ज् रॅकेटचा पर्दाफाश करत या प्रकरणी एका महिलेसह ६ आरोपींना अटक केली आहे. प्रवीण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे, वासुदेव लक्ष्मण जाधव, प्रसाद मोहिते, विकास महादेव मालमे, अविनाश महादेव माली, लक्ष्मण शिंदे अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने केलेल्या कारवाईत एकूण २५२ कोटी २८ लाख किमतीचे एमडी ड्रग्ज् हस्तगत करण्यात आले आहे.
या प्रकरणी काही दिवसांपूर्वी एक महिला आणि पुरुष याला कुर्ला येथून अटक करण्यात आली होती. कारवाईत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. या आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांनी ज्या ठिकाणी या अमली पदार्थांची निर्मिती केली जाते त्या कारखान्याचा शोध लावला. या तपासात पोलिस सांगलीमधील तालुका कवठेमहांकाळ इरळी या गावी पोहचले. मुंबई पोलिस पथकाच्या गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या माहिती आधारे, तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे अमली पदार्थ बनवण्याचा इरळी येथील हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईमध्ये १२६.१४१ किलोग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची जवळजवळ किंमत २५२ कोटी २८ लाख एवढी आहे. या प्रकरणात ६ आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलिस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.