SPORTS | हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या यशाचा तिरंगा फडकावला. त्यांनी जपानचा 5-1 ने धुव्वा उडवत नऊ वर्षांनी सुवर्णपदक पटकावले. या ‘सोनेरी यशा’सह हिंदुस्थानच्या हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले आहे. हॉकीतील कामगिरीसह तिरंदाजीत हिंदुस्थानला पुरुष रिकर्व्ह गटाचे रौप्यपदक मिळाले आहे. कुस्तीत कांस्यपदकाची कमाई केली. गुरुवारीच हिंदुस्थानने आशियाई स्पर्धेतील आपल्या 71 पदकांचा विक्रम मागे टाकला होता, तर आज पदक संख्या 95 पर्यंत पोहोचवत शतकासमीप झेप घेतली आहे. आतापर्यंत हिंदुस्थानने 22 सुवर्ण, 34 रौप्य व 39 कांस्य अशा एकूण 95 पदकांची कमाई केली आहे.
हॉकीत हिंदुस्थान अव्वल..
हिंदुस्थानच्या हॉकी संघाने जपानचा 5-1 असा पराभव केला. हिंदुस्थानकडून कर्णधार हमरनप्रीत सिंगने 2 तर मनप्रीत सिंह, अमित रोहिदास, अभिषेक यांनी प्रत्येकी 1 गोल केला. जपानला संपूर्ण सामन्यात एकदाच हिंदुस्थानची गोलपोस्ट भेदण्यात यश आले. हिंदुस्थान आणि जपान यांच्यातील पुरुष हॉकी अंतिम सामन्यात पहिले क्वार्टर हे गोलशून्य बरोबरीत राहिले. दोन्ही संघाला प्रतिस्पर्ध्यांचा गोलपोस्ट भेदण्यात अपयश आले, मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये मनप्रीत सिंगने 25 व्या मिनिटाला हिंदुस्थानचे गोलचे खाते उघडले.
तिरंदाजीत आज अतून दास, तुषार शेळके आणि धीरज बोम्मादेवारा यांनी इतिहास रचत रौप्य पदक पटकावले. पुरुषांच्या रिकर्व्ह गटाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरला. दक्षिण कोरियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने कडवी टक्कर दिली. दक्षिण कोरियाने पहिल्या सेटमध्ये परफेक्ट 10 शॉट्स मारून 2-0 अशी आघाडी घेतली.