पालघर : साधूंच्या वेशात चार आतंकवादी जयपूर-बांद्रा एक्सप्रेस ट्रेनमध्ये असल्याचे पोस्ट रेल्वेच्या हेल्पलाइनवर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पालघर रेल्वे स्थानकात या चारही साधूंना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता चारही साधू अडगडानंद महाराज यांच्या आश्रमात जाण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरहून बांद्राकडे जाणाऱ्या जयपूर-बांद्रा एक्सप्रेस ट्रेनमध्ये साधूंच्या वेषात असलेले चार जण आतंकवादी असल्याचा संशय घेत ट्रेनमध्ये प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने ”चार आतंकवादी दिखाई दे रहे है’ अशा आशयाची रेल्वे हेल्पलाइनच्या एक्स (ट्विटर) वर पोस्ट केली. या पोस्टमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती पालघर आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना तात्काळ देण्यात आली. सदर ट्रेन पालघर रेल्वे स्थानकात येणार असल्याने मिळालेल्या माहितीनंतर पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी रेल्वेच्या ट्रेन तपासणी व सदर साधूंच्या चौकशीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
जयपुर-बांद्रा एक्सप्रेस ट्रेन पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आल्यानंतर १९७०६१/c या डब्यात बसलेल्या अलखा नंद महाराज (७५), राजाराम बाबा (७८), योगानंद (३४) व एक ४५ वर्षीय अशा चार साधूंना आरपीएफ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चारही साधू राजस्थानमधील रहिवासी असून त्यांनी हिंडोन स्थानकातून पॅसेंजर पकडून सवाई माधोपूर स्थानकातून बांद्रा येथे जाणाऱ्या जयपूर-बांद्रा एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसले. ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी या चार साधूंशी संवाद साधत अनेक उलटसुलट प्रश्न विचारू लागल्याने या साधूंनी प्रवाशांशी बोलणे बंद केले. त्यानंतर एका प्रवाशाने रेल्वे हेल्पलाइनवर चार आतंकवादी साधूंच्या वेशात आल्याचे पोस्ट केले. मात्र चौकशीत हे साधू पालघर तालुक्यातील वडराई अडगडानंद महाराज यांच्या आश्रमात जाण्यासाठी आले असल्याचे उघड झाले आहे. आरपीएफ पोलिसांनी या चारही साधूंचे जबाब नोंदवून घेतले असून चारही सोडून देण्यात आले आहे.