मुंबई : महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली असून आता ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी अपुरा पडत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली. आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी प्रक्रिया क्लिष्ट असल्याचे सांगत आयोगाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. मतदानाचा हक्क अबाधित राहावा आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी एसआयआर प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आयोगाने मुदतवाढीसह नवीन वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप (ड्राफ्ट) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर नागरिकांना २३ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर प्राप्त दावे व हरकतींवर नोटिसा बजावणे, सुनावणी घेणे आणि आवश्यक दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत पार पडेल. सर्व हरकतींचा निपटारा झाल्यानंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी अंतिम यादी १९ ऑक्टोबर, त्याआधी ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते; मात्र प्रक्रियेची व्याप्ती आणि वाढलेला कालावधी लक्षात घेऊन हे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एसआयआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता देत निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर महत्त्वपूर्ण शिक्कामोर्तब केले आहे. मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करणे, नवीन पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे तसेच बोगस किंवा अपात्र नावे वगळणे हे काम निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकाराच्या कक्षेत येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. बिहारमधील विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याचिकाकर्त्यांनी ही प्रक्रिया राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)सारखी असून आयोगाला नागरिकत्व तपासण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत एसआयआर प्रक्रिया कायदेशीर आणि घटनासम्मत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मतदार याद्या अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रिया आता नव्या वेळापत्रकानुसार पुढे सुरू राहणार असून, पात्र मतदारांनी निश्चित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले नाव मतदार यादीत कायम राहील याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

