मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करून चोर बाजारात त्याची विक्री होत असल्याची माहिती डीआरआयला गुप्तचर विभागाकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आ रे कारवाई करत, तस्करी करून आणलेल्या सोन्याची खरेदी विक्री करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या जागेची ५ मार्च २०२४ रोजी तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना तेथे परदेशी बनावटीचे मुख्यतः विटांच्या स्वरूपातील १०.७ किलो सोने, तसेच सोने तस्करीच्या विक्री व्यवहारांतून मिळवलेली १.८ कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आणि त्यांनी ती ताब्यात घेतली. धाडीदरम्यान अधिकाऱ्यांनी या टोळीतील दोन जणांना ताब्यात घेतले आणि यापैकी एक जण ही टोळी चालवत असल्याचे निदर्शनास येताच त्याच्या घरी टाकलेल्या धाडीत तस्करी करून आणलेले ३.७७ किलो सोने ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या अधिक माहितीवरुन, ५ मार्च २०२४ रोजी टोळीच्या प्रमुखाच्या घरी शोधमोहीम राबवण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले. पथकातील अधिकाऱ्यांना पाहून त्या माणसाने १४ व्या मजल्यावरील त्याच्या निवासस्थानातून संशयास्पद वस्तू फेकून देण्यात यश मिळवले. या परिसरातून ६० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.
चौकशीदरम्यान, टोळीच्या प्रमुखाने सांगितले की त्याने त्याचे फोन आणि परदेशी बनावटीच्या सोन्याच्या दोन विटा फेकून दिल्या. सुमारे १५ तासांची शोधमोहीम आणि पाठपुरावा केल्यानंतर ६ मार्च २०२४ रोजी प्रमुखाच्या सोसायटीला लागून असलेल्या दोन सोसायट्यांमधील दोन रहिवाशांकडून टोळी प्रमुखाच्या मालकीचे ३ मोबाईल फोन आणि प्रत्येकी १ किलो वजनाच्या २ सोन्याच्या विटा ताब्यात घेण्यात आल्या. या रहिवाशांना तपासणीच्या रात्री योगायोगाने या वस्तू मिळाल्या होत्या आणि त्यांनी त्या स्वतःजवळच ठेवल्या होत्या. या प्रमुखाची पत्नीदेखील या टोळीची सक्रीय सदस्य आहे आणि ती कारमधून पळून जात आहे. ही माहिती मिळाल्यावर, ६ मार्च २०२४ रोजी पहाटे तिला अडवण्यासाठी पथक तैनात करण्यात आले. सुमारे ६ तासांच्या पाठलागानंतर तिला पकडल्यावर सोने विक्री व्यवहारांतून मिळालेली चांदी आणि रोख रक्कम ठेवलेली तिजोरी तिच्या फार्महाऊसवर असलेल्या तिच्या मदतनीसाच्या घरी ठेवल्याची माहिती तिने दिली. त्या मदतनीसाच्या घरी धाड घातल्यावर तेथून ६ किलो सोने आणि २५ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी तस्करी केलेले १०.४८ कोटी रुपयांचे एकूण १६.४७ किलो, तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेली चांदी आणि २.६५ कोटी रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली तसेच टोळीच्या प्रमुखासह एकूण ६ व्यक्तींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.