मुंबई : मालवणीमध्ये राम नवमीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र मिरवणुकीत कुणीही भडकावू भाषण देणार नाही, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्या. तसेच कुणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई करा, तो कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे हे पाहून कारवाई करू नका, अशा शब्दांत न्यायालयाने शिंदे सरकारची कानउघाडणी केली. नितेश राणे, गीता जैन, टी. राजा या भाजप आमदारांनी भडकावू विधाने केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून कारवाई करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करीत अफताब सिद्विकी व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याच वेळी राम नवमीनिमित्त मालाड-मालवणी परिसरात काढण्यात येणारी मिरवणूक रोखण्याची मागणी करण्यात आली. आयोजकांनी मुद्दाम अल्पसंख्याक भागातून मिरवणूक काढण्याची योजना आखली आहे.
या मिरवणुकीचा मार्ग बदलण्याबाबत निर्देश द्या, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. त्यावर आम्ही मिरवणूक रोखू शकत नाही. परंतु कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे. मिरवणुकी वेळी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा. आयोजक वा भडकावू भाषण देणारा व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाचा आहे हे पाहून कारवाई करू नका, असे खंडपीठाने शिंदे सरकारला सुनावले. याच वेळी भाजप आमदारांवर कारवाईची मागणी करणाऱया याचिकेवर बाजू मांडण्यास सरकारने आणखी वेळ मागितला. याबाबत २३ एप्रिलला सुनावणी होईल. भडकाऊ भाषणे दिल्याचा आरोप असलेल्या भाजप आमदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत मुंबई आणि मीरा–भाईंदरचे पोलीस आयुक्त आठवडाभरात निर्णय घेतील, असे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कळवले. त्यावर संबंधित नेत्यांच्या भाषणांचे रेकार्ंडग तपासण्याकामी तुम्ही व्यक्तिशः लक्ष घाला, असे निर्देश न्यायालयाने महाधिवक्त्यांना दिले.