नाशिक : महाराष्ट्रविधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडले व २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. या निकालात महायुतीची प्रचंड मोठी सुनामी आल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला व त्यांना ५० चा आकडाही गाठता आला नाही. त्यानंतर ईव्हीएमवर संशयाचे मोहोळ उठले आहे. विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधकांकडून पुन्हा वज्रमूठ करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली होती. त्यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यासंदर्भातील पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्याने सुधाकर बडगुजर यांना दिले आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या उमेदवार सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. त्यांना १ लाख ४१ हजार ७२५ मते मिळाली असून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा हिरे यांनी ६८ हजार १७७ मतांनी पराभव करत हॅटट्रिक साधली. बडगुजरांना ७३ हजार ५४८ मते मिळाली आहेत. मनसेचे दिनकर पाटील यांना ४६ हजार ६४९ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या निकालानंतर राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा तसेच हॅक केल्याचा आरोप करत फेर मतमोजणीची मागणी केली जाऊ लागली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावाने देखील मतदान झाल्याचा दावा परळीसह अनेक मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
बडगुजर यांनी निवडणूक आयोगाला यासाठी पत्र पाठवले होते. त्यांच्या मागणीनंतर एकूण असलेल्या बुथ पैकी ५ टक्के बुथवर फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे. फेर मतमोजणीसाठी एक बुथसाठी ४० हजार रुपये शुल्क आणि जीएसटी भरण्याचे पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांना दिले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्रे (ईव्हीएम) सील करून गोदामात ठेवण्यात आली आहेत. ही यंत्रे आता ४५ दिवस सील राहणार आहेत. एखाद्या उमेदवाराने निकालावर आक्षेप घेतल्यास न्यायालयीन प्रक्रियेसाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे राज्यभरातील मतदान यंत्रे ४५ दिवसांपर्यंत सील राहणार आहे. मतदान यंत्रासह कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशीन सील करुन ठेवण्यात आली आहेत.