रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. या जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात जवळपास उमेदवार निश्चित मानले जात आहेत. दापोली, गुहागर आणि राजापुर या जागेवर ठाकरे यांचे उमेदवार ठरले आहेत. पुढील काही दिवसात नवरात्र उत्सव सुरू होत आहे. त्या शुभ मुहर्तावर या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्ष फुट आणि त्यानंतर एसीबीसीची चौकशी लागली तरी राजन सावळी मागे हटले नाहीत. अत्यंत कठीण काळात ते पक्षाच्यासोबत राहिलेत, त्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर याच मतदारसंघातून महायुतीकडून किरण सामंत कामाला लागले आहेत. मतदारसंघातील विविध भागात त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे महायुतीकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गुहागर मतदारसंघात विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र त्यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी मध्यंतरी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. परंतु त्या जागेवरूनही सस्पेस कायम आहे. भास्कर जाधव यांच्याविरोधात श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्या बैठकीत विपुल कदम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तेब झाल्याचे समजत आहे.
दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम यांच्याविरोधात संजय कदम यांनी विधानसभेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अलिकडेच संजय कदम यांनी राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसापासून संजय कदम आणि योगेश कदम यांच्यात वाद सुरू झाले आहेत. त्यामुळे येथील निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.