नाशिक : नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांध्ये वादाची ठिणगी पडली आहे. नाशिक पूर्वचे महाविकास आघाजीचे उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचार वाहनावर हल्ला झालेला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांच्या प्रचार वाहनावर हल्ला केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे नाशिकमध्ये वातावरण तापलेले असून घटनेनंतर तणावही वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलेला असताना महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वादाच्या घटना घडत आहेत.निवडणूक जाहीर झाल्यापासूनच नाशिक पूर्व मतदारसंघ हा चर्चेतील मतदारसंघ राहिलेला आहे. नाशिक पूर्वचे मविआचे उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचार वाहनावर हल्ला करण्यात आल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ संघर्ष झाला.
गणेश गीते यांच्या प्रचार वाहनाबरोबर त्यांच्या भावाची गाडीही फोडण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात हा राडा झाला. दुसरीकडे या गाड्यांतून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याने आम्ही त्यांना रोखल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे नाशिक शहरातील सगळे उमेदवार पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. प्रचाराची वाहने घेऊन सर्व उमेदवार पोलीस आयुक्तालयात गेलेले असून निवडणूक अधिकारी देखील थोड्याच वेळात पोलीस आयुक्तालयात येणार असल्याचे समजते आहे.
भारतीय जनता पक्षाची रॅली सुरू होती. त्यावेळी महाविकास आघाजीच्या प्रचार वाहनातून पैशाचे वाटप होत असल्याचे समजल्याने आम्ही त्याठिकाणी जाऊन चौकशी केली. त्यामुळे दोन्ही समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याचे भाजपने घटनेनंतर सांगितले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते हे भारतीय जनता पक्षातून आलेले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पक्षानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच चिडलेले होते. या निवडणुकीत गणेश गीते यांना आस्मान दाखविण्याचा निर्धार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नाशिक पूर्वमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे.