मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव असलेल्या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात येणार होती. मात्र तत्पूर्वीच मंडळाने निविदा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली. मुंबई मंडळाने मार्चमध्ये १७ भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवार नगर (विक्रोळी), प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा ई लिलावात समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मनोरंजन मैदान अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडांसाठी मुंबई मंडळाने एक बोली निश्चित केली आहे. ४५ हजार ३०० रुपये प्रति चौरस मीटरपासून १ लाख ६ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित करण्यात आली आहे. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत करण्यात येणार आहेत. ई लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम अदा करावी लागणार आहे.
मुंबई मंडळाला या भूखंड विक्रीतून किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ एप्रिल होती. मात्र आचारसंहिता आणि अधिक प्रतिसाद मिळावा या उद्देशाने निविदा सादर करण्याची मुदत संपण्याआधीच या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियेस ७ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत मंगळवार, ७ मे रोजी संपणार होती. मात्र तत्पूर्वीच निविदा सादर करण्यास मंडळाने तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुकांना १० मेपर्यंत निविदा सादर करता येतील, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.