ठाणे : तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या अडचणींचे निराकरण आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण, मुंबई विभाग) आणि सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) यांच्या संयुक्त पुढाकारातून बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी ठाण्यात विशेष विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत तृतीयपंथीयांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासोबतच त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध विभाग आणि जिल्हास्तरावर तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या कार्यशाळेद्वारे त्या समित्यांचे काम अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ही एकदिवसीय कार्यशाळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडणार आहे. समाज कल्याण विभाग, मुंबई व ठाणे तसेच विभागीय तृतीयपंथी मंडळ, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण, त्यांच्या अधिकारांबाबत कायदेशीर मार्गदर्शन, अधिकृत ओळखपत्र वितरणाची प्रक्रिया सुलभ करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना यांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय, या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे आणि सामाजिक जनजागृतीपर उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे तृतीयपंथीयांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले जाईल. सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) समाधान इंगळे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय बांधवांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

