अंबरनाथ प्रतिनिधी : अंबरनाथमध्ये पिसुरी जातीच्या दुर्मिळ हरणाच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोळ्या लागून जखमी अवस्थेत असलेले हरीण अंबरनाथ एमआयडीसी भागात आढळून आले होते. या नंतर त्याला उपचारांसाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं आहे.
पिसुरी जातीचं हे हरीण संरक्षित प्रजातीत मोडतं. रविवारी पहाटेच्या सुमारास अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील एका कारखान्याजवळ हे हरीण एका कामगाराला जखमी अवस्थेत आढळून आले. याबाबत त्याने लागलीच प्राणीमित्र आणि वन विभागाला माहिती दिली. यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत हरणाला ताब्यात घेतलं. यावेळी हे हरिण गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला उपचारांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं.
याठिकाणी हरणाची तपासणी केली असता त्याच्या शरीरात ५ गोळ्या आढळून आल्या. त्यामुळे दुर्मिळ प्रजातीच्या या हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. आता त्याच्या शिकारीचा प्रयत्न नेमका कोणी केला? याचा तपास वन विभागाकडून केला जात आहे.