मुंबई प्रतिनिधी : अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी नियुक्त करण्यात आली आहे. सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुलं वाट पाहत राहिली, मात्र दुर्दैवाने आईचं पार्थिवच घरी आलं.
मुंबईत बुधवारी (२५ सप्टेंबर २०२४) सायंकाळी मुसळधार पावसामुळे अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात ४५ वर्षीय विमल गायकवाड यांचा पर्जन्य जलवाहिनीत कोसळून दुर्दैवी मृत्यू ओढवला.
विमल गायकवाड या सुमारे १०० मीटरपर्यंत वाहून गेल्या. सुमारे एक तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह सापडला, असे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी देखील नियुक्त करण्यात आली आहे.