ठाणे : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पत्रक काढून ते अंमलबजवाणीसाठी ठाणे पोलिसांना पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तहसीलदार संजय भोसले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने एक पत्रक ठाणे पोलिसांना प्राप्त झाले होते. या पत्रकामध्ये किल्ल्याजवळ प्रार्थना करण्यास मज्जाव करून त्याची अंमलबाजवणी करावी असे म्हटले होते. पत्रकावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी होती. अशा स्वरूपाचे पत्र प्राप्त झाल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली. त्यावेळी असे कोणतेही पत्रक आम्ही काढले नसल्याचे समोर आले. पोलिसांनी पडताळणी केली असता, हे पत्रक बनावट स्पष्ट झाले. त्यानंतर याप्रकरणाची माहिती तहसिलदार संजय भोसले यांना देण्यात आली. त्यांनी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.