नाशिक प्रतिनिधी : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौर्यावर आले असतानाच मद्यधुंद अवस्थेत तीन युवक आणि एका ३२ वर्षीय युवतीने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर बोगद्यात घडली. ही घटना बुधवारी (दि.२५) सकाळी ९.३० वाजता घडली. पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतले आहे. पोलीस शिपाई नाझीम हुरा शेख (३४, रा. सरस्वतीनगर, अमृतधाम, नाशिक) असे जखमीचे नाव आहे. ऐश्वर्या पाटील (वय ३२, रा. सिरीन मेडोज, आनंदवली, गंगापूर रोड) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार व नाझीम शेख यांच्या फिर्यादीनुसार, शेख बुधवारी सकाळी इंदिरानगर बोगदा परिसरात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एक युवक त्यांच्याकडे आला. त्याने कारमधील चौघे जण त्रास देत असल्याची तक्रार केली. त्यानंतर शेख यांनी त्यास मुंबईनाका पोलिसांकडे जाण्यास सांगितले. काही वेळेनंतर शेख यांच्याजवळ कार(एमएच ०२ बीजे ७५७८) आली. कारमधील तीन पुरुष व एका महिलेने त्यांना त्या युवकाबद्दल चौकशी केली. शेख यांनी युवकास पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले आहे, असे बोलले. तितक्यात अंदाजे २५ वयोगटातील एका युवकाने पाठीमागून अज्ञात वस्तूने शेख यांच्यावर चेहर्यावर मारहाण केली. त्यानंतर दोघांनी शेख यांना मारहाण केली. त्यावेळी संशयित महिला ऐश्वर्या पाटील हिने देखील शेख यांना धक्काबुक्की केली.
ही बाब नागरिकांना समजली असता नागरिकांनी संशयित महिलेस व त्यांच्या कारला अडवले. पोलिसांनी महिलेसह कार ताब्यात घेतली. शेख यांच्या फिर्यादीनुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात महिलेसह तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.