ठाणे प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अधिवास असलेला, परंतु परराज्यातून आयुर्वेद पदवी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी राज्य कोट्यातून प्रवेशासाठी पात्र ठरत नव्हते. मात्र आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे अशा विद्यार्थ्यांचा राज्यातील शासकीय व शासकीय अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यातून प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परराज्यातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अखिल भारतीय कोट्याबरोबरच राज्य कोट्यातून प्रवेश मिळणार आहे.
बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (BAMS) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय आणि राज्य कोट्यातून प्रवेश दिले जातात. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय व शासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये 85 टक्के, तर खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यांतर्गत 70 टक्के जागा राखीव असतात. या दोन्ही कोट्यात राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. तर उर्वरित 15 व 30 टक्के जागांवर परराज्यातील विद्यार्थ्यांना अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश दिला जातो.
अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट होती. यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमात आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश दिले. यानुसार आता, परराज्यातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्य कोट्यातून प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून प्रवेश देण्यासंदर्भातील निर्णय वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25च्या आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश नियमावलीमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे परराज्यातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.