मिरा-भाईंदर : मिरा रोड येथील सेवेन स्क्वेअर अकॅडमी या शाळेने पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवलेल्या एका संदेशामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या संदेशात पर्यूषण काळात विद्यार्थ्यांनी शाळेत आणल्या जाणाऱ्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ टाळावेत, असे आवाहन करण्यात आले होते. तसेच या काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही अशा पदार्थांचा वापर न करता खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातील, असे स्पष्ट करण्यात आले. शाळेने हा निर्णय धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर राखण्यासाठी घेतल्याचे सांगितले असले, तरी या सूचनेमुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. मिरा-भाईंदर परिसरात मागील काही महिन्यांपासून विविध सामाजिक आणि भाषिक मुद्द्यांवरून वादाचे वातावरण निर्माण होत असताना या घटनेने त्यात आणखी भर पडली आहे. विशेषतः मराठी आणि बिगर मराठी समाजातील विविध प्रश्नांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक संवेदनशील ठरला आहे. त्यामुळे शाळेच्या या आवाहनावर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत शाळेने अशा प्रकारचे मार्गदर्शन करावे का, यावरही मतमतांतरे व्यक्त होत आहेत.
या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. काही पालकांनी शाळेचा व्हॉट्सॲप संदेश मनसेचे पदाधिकारी सचिन पोपळे यांना दाखवल्यानंतर त्यांनी शाळेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विद्यार्थ्यांनी डब्यात काय आणायचे हे ठरवण्याचा अधिकार शाळेला कोणी दिला?” असा सवाल त्यांनी केला. ही शाळा भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित असल्याचा उल्लेख करत मनसेने या निर्णयावर टीका केली. तसेच, “उद्या एखाद्या मराठी उद्योजकाने शाळा सुरू करून गटारी अमावास्येच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना चिकन, मटण किंवा अंडी आणण्यास सांगितले, तर ते मान्य केले जाईल का?” असा प्रतिप्रश्नही मनसेकडून उपस्थित करण्यात आला. या घटनेमुळे धार्मिक परंपरा, शैक्षणिक संस्थांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहारस्वातंत्र्य या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सध्या या प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसले, तरी पालक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे हा वाद पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

