वृत्तसंस्था : भारतातील आघाडीची ओम्नी-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन विजय सेल्सने भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे राहुल द्रविड यांची आपल्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. या सहकार्याद्वारे ग्राहकांचा विश्वास, सातत्य, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवा या समान मूल्यांना अधिक बळकटी देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ विजय सेल्सने भारतीय कुटुंबांच्या इलेक्ट्रॉनिक्स खरेदीच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पहिला टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी असो किंवा आधुनिक तंत्रज्ञानानुसार अपग्रेड करण्याचा निर्णय, ग्राहकांना योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सेवा देण्याची परंपरा कंपनीने सातत्याने जपली आहे. ‘डिलिव्हरिंग अपनापन’ या ब्रँड संकल्पनेद्वारे ग्राहकांशी केवळ व्यवहार न करता दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्यावर विजय सेल्सचा भर राहिला आहे. कंपनीचे संचालक निलेश गुप्ता यांनी सांगितले की, ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, योग्य सल्ला देणे आणि खरेदीनंतरही त्यांच्यासोबत कायम राहणे हीच विजय सेल्सची खरी ताकद आहे. राहुल द्रविड यांची संयमी, विश्वासार्ह आणि प्रामाणिक प्रतिमा या मूल्यांशी पूर्णपणे सुसंगत असल्याने त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. देशभरातील ग्राहकांमध्ये द्रविड यांच्याविषयी असलेला आदर आणि विश्वास कंपनीच्या ब्रँड प्रतिमेला अधिक मजबूत करेल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.
या नव्या सहकार्याबद्दल राहुल द्रविड यांनीही आनंद व्यक्त करताना सांगितले की, काही ब्रँड्स केवळ उत्पादने विकत नाहीत, तर ग्राहकांच्या विश्वासावर टिकून राहतात आणि त्यांच्यासोबत भावनिक नाते निर्माण करतात. विजय सेल्सने अनेक दशकांपासून भारतीय कुटुंबांसोबत असेच विश्वासाचे नाते जपले असून ‘डिलिव्हरिंग अपनापन’ ही संकल्पना त्यांना विशेष भावली आहे. त्यामुळे या ब्रँडसोबतच्या प्रवासाचा भाग बनताना त्यांना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विजय सेल्स आपल्या ओम्नी-चॅनल व्यवसायाचा वेगाने विस्तार करत असून ऑफलाइन स्टोअर्समधील तज्ज्ञ सेवा आणि ऑनलाइन खरेदीचा सहज अनुभव यांची प्रभावी सांगड घालत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल द्रविड आगामी काळात कंपनीच्या दूरदर्शन, डिजिटल, सोशल मीडिया, इन-स्टोअर आणि विविध ग्राहक संपर्क मोहिमांमध्ये प्रमुख चेहरा म्हणून दिसणार आहेत. वर्षभरातील विविध उत्पादन श्रेणींच्या प्रचार मोहिमा तसेच सणासुदीच्या विशेष ऑफर्समध्येही ते ब्रँडचे प्रतिनिधित्व करतील. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांच्या अपेक्षा आणि गरजा सातत्याने बदलत असल्या, तरी विश्वास, गुणवत्ता, प्रामाणिक सेवा आणि आपुलकी ही विजय सेल्सची मूलभूत मूल्ये कायम राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. राहुल द्रविड यांच्यासोबतचा हा सहयोग कंपनीच्या पुढील वाटचालीत विश्वासाचे नवे पर्व सुरू करणारा आणि ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करणारा ठरेल, असा विश्वास विजय सेल्सने व्यक्त केला आहे.

