ठाणे : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय, प्लास्टिक संकलन आणि पुनर्प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले. प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेट व वेफर्सची आवरणे, प्लास्टिक पिशव्या, मोबाईल कव्हर्स, शॅम्पूच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी यांसारखा विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी देण्याची सवय विद्यार्थ्यांना लागणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारल्यास ठाणे शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर होईल, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, गटअधिकारी संगीता बामणे, बिसलेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अँजेलो जॉर्ज, बिसलेरीचे प्रतिनिधी राहुल पाटील तसेच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणासमोरील आव्हाने वाढत असल्याचे सांगितले. महानगरपालिकेची जबाबदारी केवळ कचरा संकलन व प्रक्रिया करण्यापुरती मर्यादित नसून, कचरा कमी निर्माण व्हावा यासाठी समाजात जनजागृती होणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी अनेक वर्षे लागत असल्याने जलप्रदूषण आणि भूमीप्रदूषणाच्या समस्या अधिक गंभीर होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक सहभागी शाळेला विशेष पासबुक देण्यात आले असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्लास्टिक कचऱ्याची नोंद केली जाणार आहे. तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रत्येक शाळेतील प्लास्टिक संकलनाची डिजिटल नोंद ठेवली जाणार असून, पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आलेल्या प्लास्टिकचे अचूक निरीक्षण करता येणार आहे. सातत्याने सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा नियतकालिक गौरवही करण्यात येणार आहे. उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांनी पर्यावरण संवर्धनाची शिकवण केवळ पुस्तकी न राहता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संरक्षणाची सवय लावावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. बिसलेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अँजेलो जॉर्ज यांनी २०१९ पासून ठाण्यात शाळा, गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांसोबत पर्यावरण संरक्षणासाठी काम सुरू असल्याचे सांगत, ठाणे महापालिकेच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे नृत्य सादर केले, तर शिक्षकांसाठी या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष कार्यशाळाही आयोजित करण्यात आली.
