नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य, दूध खरेदी दर, वाहतूक आणि प्रक्रिया खर्चात सातत्याने झालेल्या वाढीमुळे दूध व्यवसायाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहे. नव्या दरानुसार गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ६० रुपयांवरून ६२ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा दर ७६ रुपयांवरून ७८ रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याने ग्राहकांना दूध, दही, ताक, पनीर, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दररोज दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांच्या मासिक खर्चात या निर्णयामुळे वाढ होणार असून, हॉटेल, मिठाई दुकाने, बेकरी तसेच दूधावर आधारित खाद्यपदार्थ व्यवसायांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे. साखरेचे दर प्रतिकिलो सुमारे १२ रुपयांनी वाढले असून, पॅकिंग साहित्याच्या खर्चात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर दूध खरेदी दर, वाहतूक, प्रक्रिया आणि इतर व्यावसायिक खर्चातही वाढ झाल्याने उत्पादन खर्चाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्याच्या विक्री दरात व्यवसाय चालवणे कठीण झाल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे.
दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरी येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग आणि वाहतूक खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाढत्या खर्चामुळे दूध उत्पादकांवर वाढणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे संघाने स्पष्ट केले. उत्पादन खर्च वाढत असताना दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. त्यामुळे प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करून वाढत्या खर्चाचा काही प्रमाणात समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासोबतच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अॅनालॉग पनीरवरील बंदीच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचे आभार मानण्यात आले. ११ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या नव्या दरांमुळे दूध उत्पादकांना वाढत्या उत्पादन खर्चाचा काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा असली, तरी त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या मासिक घरगुती बजेटवर होणार आहे.

