मिरा-भाईंदर : काशीगाव पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन पथकाने उत्कृष्ट तपासकौशल्याचा परिचय देत मिरारोड येथे घडलेल्या ११ लाख ५५ हजार रुपयांच्या चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीस गेलेली संपूर्ण ११ लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात यश मिळवले. १७ जुलै रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास मिरारोड येथील बाबा टायर्ससमोर उभ्या असलेल्या थार वाहनातून ही रोख रक्कम चोरीला गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मित्र आपल्या घरी जात असताना त्यांच्या थार वाहनाचे टायर पंचर झाल्याने त्यांनी बाबा टायर्स येथे वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वाहनाचे दार उघडून आत ठेवलेली रोख रकमेची बॅग लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळानंतर बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी तात्काळ काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी विलंब न करता डिटेक्शन पथकाला घटनास्थळी रवाना करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. संशयिताची ओळख पटताच त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी तो ज्या मार्गाने गेला त्या परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासात आरोपी मिरा-भाईंदर परिसरात फिरताना दिसून आला. पुढील तपासात तो नया नगर येथील व्होकार्ड हॉस्पिटल परिसरातील एका इमारतीत प्रवेश करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित इमारतीची माहिती मिळवून आरोपीच्या घराचा शोध घेतला. तपासात चोरीची रोख रक्कम असलेली बॅग आरोपीने घरात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर काशीगाव पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आणि चोरीस गेलेली ११ लाख ५५ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम शंभर टक्के हस्तगत केली. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे काशीगाव पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक होत असून, नागरिकांमध्येही पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.

