पुणे : शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त करण्यासाठी पुणे महापालिका महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात कचरा आणि बांधकामातील राडारोडा टाकला जात असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा जागांना हिरव्या रंगाच्या जाळीचे कुंपण घालणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यासोबतच मुख्य रस्त्यालगत असलेल्या इमारतींच्या बाल्कनीत कपडे वाळत घालण्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवत, अशा प्रकारांवर निर्बंध आणण्याचाही महापालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे. पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित ‘स्वच्छ संवाद’ कार्यक्रमात आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत संकेत दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारूळे, अतिक्रमण विभागाचे सोमनाथ बनकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त राम यांनी शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर नसून नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. मोकळ्या जागांवर कचरा टाकण्याचे प्रकार थांबवण्यासाठी कुंपण बंधनकारक करण्याबाबत आणि शहराच्या सौंदर्यासाठी आवश्यक नियम तयार करण्याचे काम पुढील सात दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दयनीय अवस्थेबाबतही आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. शहराचा वेगाने विस्तार होत असून लोकसंख्या सुमारे ८० लाखांपर्यंत पोहोचली आहे. महापालिकेचा १६ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आणि २५ हजार कर्मचारी कार्यरत असतानाही अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती समाधानकारक नसल्याचे त्यांनी नमूद केले. अस्वच्छ स्वच्छतागृहे ही शहरासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत त्यांनी या सुविधांची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः झोपडपट्टी भागांमध्ये स्वच्छतेची समस्या अधिक गंभीर असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. स्वच्छता शुल्क भरणे आणि स्वच्छता उपक्रमांमध्ये नागरिकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे या भागांमध्ये मोफत स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्याचा पर्यायही प्रशासन विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक राहण्यायोग्य बनविण्यासाठी लवकरच व्यापक धोरण जाहीर करण्यात येणार असून, त्यामध्ये कचरा व्यवस्थापन, मोकळ्या भूखंडांचे संरक्षण, सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुधारणा आणि शहराच्या सौंदर्यवृद्धीसाठी विविध उपाययोजनांचा समावेश असणार आहे.
