क्लीव्हलँड, ओहायो : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी संकल्पना असून ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हील इन इंडिया’ दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी केले. क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टॉम मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया, डॉ. फाल्कोने, उद्योगपती लक्ष्मी मित्तल तसेच आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागीदारीला भारतातील आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात संबोधत क्लीव्हलँड क्लिनिकच्या नेतृत्वाचे आभार मानले.
सुमारे २५० एकर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीमध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय व परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सेवा नवोन्मेष केंद्रे तसेच वेलनेस पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात सुमारे १.२ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक अपेक्षित असून १० हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करत जागतिक दर्जाचे वैद्यकीय कौशल्य आणि संशोधनाचा अनुभव उपलब्ध करून देणार आहे. तसेच लक्ष्मी एन. मित्तल यांनी स्थापन केलेली जयपूर येथील एलएनएमआयआयटी संस्था संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रिसिजन मेडिसिन आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा नवोन्मेषासाठी सहकार्य करणार आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी, परवानग्या आणि धोरणात्मक सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे नवी मुंबई जागतिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

