मुंबई : ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या ईशा डेनं ११ मार्च २०२६ रोजी गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्नगाठ बांधली. ईशा आणि अभिषेक यांच्यात पाच वर्षांचा फरक असून त्यांची पहिली भेट रुईया कॉलेजमध्ये झाली. भेट जरी कॉलेजमध्ये झाली असली तरी त्यांचे ऋणानुबंध मात्र जवळपास १५ वर्षांनी जुळले. अशातच आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशा डेनं तिची आणि अभिषेकची फिल्मी लव्हस्टोरी सांगितली आहे.
नशिबात असेल तर कधीही काहीही होऊ शकतं! असं म्हणतात. हेच ईशा डेच्या बाबतीत घडलं. मुलाखतीदरम्यान ईशा डे म्हणाली की, ‘मी ११वीत कॉलेजमध्ये आले, त्यावेळी अभिषेक पासआउट झालेला. तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. तो आमच्या एकांकिकेचं म्युजिक करत होता. माझ्या मित्रमैत्रिणींना माहित होतं, मला तो आवडतो. बघताच क्षणी मला तो आवडला. अभिषेक कॉलेजमध्ये स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जायचा. मी धाडसाने कुठूनतरी त्याचा नंबर मिळवला आणि फोन केला. मी त्याला सांगितलं, ‘मला तू आवडतोस’ त्यावर तो मला म्हणाला, ‘तू आताच आली आहेस कॉलेजला. एक्सप्लोर कर, नवीन गोष्टी शिक, लगेच प्रेमात पडू नकोस.’ त्याने मला असा सिनिअर सल्ला दिलेला. मी तेव्हा खूप प्रेमात होते त्याच्या. कॉलेजनंतर आमचा फार काही संपर्क नव्हता. आम्ही दोघेही आयुष्यात पुढे गेलो. फक्त योगयोग असा की, आमचा वाढदिवस एकाच तारखेला असतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना वाढदिवसाच्या दिवशी सेम टू यु म्हणायचो, तेवढंच बोलणं व्हायचं. गेल्या वर्षी त्यानं हास्यजत्रेचं स्किट बघितलं, त्यात मी गायले होते आणि तो हास्यजत्रेचा फॅन आहे. स्किटमध्ये मला गाताना बघून त्यानं ‘बरं गातेस की!’ असा मेसेज केला. नंतर मग आम्ही रोज बोलायला लागलो. आम्ही खूप कनेक्ट झालो. जे हवं होतं त्यापेक्षा जास्त मिळालं, असं झालं आमचं.’ ‘आम्ही गेल्या वर्षी ११ मार्च २०२५ रोजी बोलायला लागलो, १४ मार्चला पहिल्यांदा भेटलो. पंधरा वर्षात आलेल्या अनेक चांगल्या-वाईट अनुभवानंतर, खऱ्या अर्थाने ‘कम्पॅनियनशिप म्हणजे काय?’ याचं उत्तर एकमेकांत सापडलं आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्हीच लग्नाची तारीख ठरवली. ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा बोललो ती तारीख म्हणजे ११ मार्च. परत वेगवेगळं लक्षात नको ठेवायला म्हणून मग आम्ही ११ मार्चलाच लग्न करायचं ठरवलं. आमच्या कुटुंबीयांचा पण सपोर्ट होता. जे आपल्यावर खूप प्रेम करतात, तेच लोक लग्नाला असावेत, अशी आमची इच्छा होती. आमच्या ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्यासंबंधित डेकोरेशन होतं. मी नेहमी म्हणते, ‘कधीही काहीही होऊ शकतं’ आणि खणकरचं म्हणणं असतं की, ‘मज्जा आली पाहिजे’ त्यामुळे एन्ट्रीला आम्ही मोठं ‘मज्जा आली पाहिजे’ असं कमानीवर लिहिलेलं. तसंच झालं, सगळ्यांनी खूप मज्जा केली.’ असं ईशाने शेवटी सांगितलं.

