मुंबई : मुंबई मेट्रो लाईन २ए (Dahisar to DN Nagar) वरील कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकाचे नामकरण आता ‘हम डेव्हलपर्स कांदिवली वेस्ट’ (HUM Developers Kandivali West) असे करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो प्राधिकरणाने (MMMOCL) महसूल वाढवण्यासाठी स्थानकांच्या ब्रँडिंग हक्कांचा (Station Branding Rights) लिलाव केला आहे. त्याअंतर्गत ‘हम डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट कंपनीने या स्थानकाचे नामकरण हक्क मिळवले आहेत. सध्या तुम्ही ज्या रेल्वे स्थानकातून प्रवास करत आहात त्या स्थानकाचे नाव आता बदलण्यात आले आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकाला आता ‘हम डेव्हलपर्स कांदिवली वेस्ट’ असे नवीन नाव देण्यात आले आहे. हम डेव्हलपर्स कंपनीने एका कार्यक्रमात याची अधिकृत घोषणा केली. कंपनीच्या मते हे नामकरण शहराच्या वाढत्या कनेक्टिव्हिटी आणि विकास प्रक्रियेत त्यांच्या सहभागाचे प्रतीक आहे. पश्चिम उपनगरांमध्ये अलिकडे अनेक पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट प्रकल्प वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांच्या नामकरण हक्कांकडे एक नवीन व्यावसायिक संधी म्हणून पाहिले जात आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे कंपनीच्या ब्रँडची ओळख अधिक मजबूत होण्यास मदत होईल तसेच त्या परिसरालाही नवी ओळखही मिळेल असे कंपनीचे म्हणणे आहे. अलिकडच्या काळात मुंबईतील मेट्रो स्थानकांना खासगी कंपन्यांचे नाव देण्याची पद्धत वाढत आहे. यामुळे प्रकल्पांना अतिरिक्त महसूल मिळतो आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीला चालना मिळते.

