पालघर : ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना अनेकदा स्वतःला नेमकी कोणती व्याधी आहे, याची जाणीव नसते. लक्षणे दिसत नसल्याने अनेक आजार अंगावर काढले जातात, जे पुढे जीवघेणे ठरतात. या समस्येवर मात करण्यासाठी केशवसृष्टी आणि पालघर जिल्हा प्रशासनाने ‘डिजिटल क्रांती’चा आधार घेतला आहे. जिल्ह्यात ‘परिवार स्वास्थ्य कार्ड’ आणि ‘क्यूआर कोड’ असलेले विशेष मेटल लॉकेट उपक्रम राबविला जात असून, यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवणे अधिक सुलभ झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विक्रमगड, जव्हार, वाडा, कासा आणि मोखाडा या पाच तालुक्यांतील दुर्गम भागांत आतापर्यंत १००० हून अधिक नागरिकांना हे विशेष ‘हेल्थ लॉकेट’ देण्यात आले आहे. या लॉकेटमध्ये असलेल्या क्यूआर कोडमध्ये संबंधित व्यक्तीची संपूर्ण मेडिकल हिस्टरी (आरोग्य इतिहास) दडलेली असते. जर एखादा व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला किंवा अपघात झाला, आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजारांची माहिती नसेल, तर डॉक्टर केवळ तो कोड स्कॅन करून आणि ठराविक पासवर्ड वापरून रुग्णाचे रक्तगट, जुने आजार, ॲनिमिया, रक्तदाब यांसारखी सर्व माहिती मिळवू शकतात. या उपक्रमा दरम्यान डिजिटल मॅपिंग, टेलि-कन्ल्टेशन, स्टार हेल्थ कार्ड (मुलांसाठी), महिला आरोग्य शिक्षण आणि स्वास्थ्य रक्षक दांपत्य हे पाच मुख्य स्तंभ असून यामुळे ४८ पेक्षा जास्त गावे व १००० हून अधिक मुले ‘स्टार हेल्थ कार्ड’ने लाभान्वित झाली आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विक्रमगडमधील एका शेतकऱ्याचा जीव केवळ लॉकेट स्कॅन केल्यामुळे वाचला आहे. तंत्रज्ञान आणि मानवी सेवा यांचा हा संगम पालघरच्या आदिवासी पाड्यांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे.

