ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू असल्या तरी, जागावाटपाबाबत एकमत होऊ शकलेले नाही. असे असतानाच, ठाणे शहरातील विविध भागांमध्ये ‘नमो भारत, नमो ठाणे’ या बॅनर लावण्यात आलेले असून यामुळे भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युतीबाबत आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. मात्र या बैठकीतून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. जागा वाटपाचा मुद्दा आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे यामुळे चर्चा अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी अंतिम डेडलाईन देण्यात आली असून, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी माहिती भाजप आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी दिली होती.

