पनवेल : माथेरानच्या डोंगररांगांमध्ये संचार करत असलेल्या एक बिबट्या आणि त्याचा बछड्याचा वावर सध्या पनवेलच्या ग्रामीण भागात सुरू आहे. नितळस गावच्या गावक-यांनी बिबट्यासह बछड्याला स्वता पाहून त्याचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर टाकल्यावर वन विभागाने या परिसरात गस्त सुरू केली.
सोमवारपासून बुधवारपर्यंत अशा लागोपाठ तीन दिवसांमध्ये बिबट्या आणि त्याचा लहान बछडा नितळस वासियांना दिसल्याने गावात वन विभागाची गस्त घालणारे वाहन वन विभागाचे कर्मचारी गावात पोहचले. गुरुवारी रात्रींपासून गावातील तरूण मंडळींनी सुद्धा वन विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीसाठी जमले होते. हातामध्ये टॉर्च आणि काठी घेऊन बिबट्याचा वावर होत असलेल्या मार्गावर ग्रामस्थ तैनात होते. गुरुवारी काही बिबट्या दिसला नाही. मात्र बिबट्यामुळे गावातील भटके कुत्रे कमी झाल्याचा दावा ग्रामस्थांच्यावतीने सुरू आहे. या घटनेनंतर भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी गावक-यांच्या सूरक्षेसाठी पनवेलच्या तहसिलदार मिनल भामरे यांना निवेदन देऊन याबाबत वन विभागाच्या कर्मचा-यांची गस्त वाढविणे आणि सूरक्षेच्या उपाययोजना करण्याचे सूचना केली आहे. या निवेदनानंतर बिबट्यामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका होऊ नये यासाठी वन विभागाने गस्त सुरू केली.

