नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांकडून गुटखा विरोधी अभियान महिनाभरापासून सुरू असून आतापर्यंत ५५६ ठिकाणी छापे टाकून दोन कोटी, १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी यापूर्वी चार वेळा अभियान राबविण्यात आले आहे. सहा नोव्हेंबरपासून नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली. अभियानादरम्यान विशेष पथकाने केलेल्या कारवाईत परराज्यातील एका मालवाहतूक वाहनाव्दारे चांदवड शहरातून मुंबई-आग्रा महामार्गाने मुंबईच्या दिशेने ५० लाखांचा गुटखा नेण्यात येत असताना जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन संशयितांना अटक करून सुमारे ७० लाख ८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. महिनाभरात ५५६ गुन्हे दाखल करुन ७५४ संशयितांना अटक करण्यात आली आहे.